मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बेबाबाई पांडुरंग मोरे (वय ५०, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. कुऱ्हा येथे त्या भावजय आणि भाचा यांच्यासह राहतात. नातेवाईकाच्या लग्नानिमित्त फिर्यादी महिला आणि त्यांचा भाचा या मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे २३ नोव्हेंबर रोजी इतर नातेवाइकांसह गेले होते. त्यावेळेला घरी भावजय याच होत्या. दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी फिर्यादी बेबाबाई मोरे या नातेवाईकांसह लग्नाच्या सोहळ्यातून घरी परतल्या तेव्हा त्यांना घराला कडीकोंडा लावलेला दिसला.
त्यांनी आत मध्ये पाहिले असता देव्हाऱ्यात ठेवलेली पैशांची पेटीचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडले होते. तसेच पत्राच्या पेटीत ठेवलेले दागिने व चांदीच्या चैनपट्ट्या देखील त्यांना दिसून आल्या नाहीत. फिर्यादी महिलेने कामावर गेलेल्या भावजईला फोन केला असता त्यांनी कुलूप लावून चाबी सोबत आणली असल्याचे सांगितले. त्यामुळे चोरट्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मनोज मधुकर वंजारी व रोहन शांताराम धांडे (दोन्ही रा. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. या दोन्ही संशयित आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू होती.









