शिवाजी नगरात पाचव्या दिवशी दुसरा खून, जळगाव पुन्हा हादरले
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. येथिल शिवाजीनगर भागात इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळ जवळ एका 25 वर्षीय तरुणाचा चोपर या धारदार शस्त्रांनी खून झाल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत झालेल्या हाणामारीत हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.
मयत तरुणाचे नाव भूषण भरत सोनवणे (वय 25) रा. इंद्रप्रस्थ नगर परिसरातील सिध्दीविनायक पार्क जुना कानळदा रोड, जळगाव हा इंद्रप्रस्थ चौकात अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय २५, रा. शाहूनगर), प्रतीक निंबाळकर (वय २४ रा. शिवाजी नगर) व दुर्गेश आत्माराम संन्यास (वय २६ रा. गेंदालाल मिल) यांच्यासोबत रात्री 11 वाजेच्या सुमारास उभा होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित व मयत हे दारू पिलेले होते. यावेळी किरकोळ वाद होऊन भूषण सोनवणे याने शिवीगाळ करीत प्रतिकच्या कानशिलात मारली. त्याचा राग आल्याने प्रतीक निंबाळकर याने त्याच्याकडील चॉपर काढून भूषणच्या पोटात खुपसला. तसेच मानेवर, मांडीवर वार केले. त्यानंतर अतुल काटकर यानेही त्याच चॉपरने भूषणवर पुन्हा वार करीत त्याला जीवे ठार मारले. पोटात खोलवर वार झाल्याने भूषण सोनवणे हा जागीच गतप्राण झाला. यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले.
घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे दिसत असून पोलीस तपासाला लागले आहेत. रात्रीच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी गुप्त माहिती काढून अतुल काटकर यास घरातून तर फरार होत असताना प्रतीक निंबाळकर याला बहिणाबाई उद्यानाजवळून ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित रक्ताने माखले असल्याची माहिती मिळाली. तर तिसरा संशयित दुर्गेश संन्यास यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मयत भूषण सोनवणे यांच्या पश्चात लहान भाऊ, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. भूषणच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोदविण्यात आला आहे. तपास सहाययक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा करीत असून शिवाजीनगर भागात अजून तणावसदृश्य वातावरण आहे. रात्री शवविच्छेदनकरिता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, साय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा याच्या उपस्थित मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मयत भूषण हा २०१८ साली हद्दपार झालेला होता. मुदत संपल्यानंतर परत त्याच्यावर हाणामारीचे गुन्हे शहर पोलिसांत दाखल झालेले आहेत. तसेच दुर्गेश संन्यास यानेही भूषणसोबत अनेक गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रतीक निंबाळकर याच्यावर देखील एक गुन्हा यापूर्वी नोंद होता तर अतुल काटकर याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पूर्ववैमनस्यातून माजी महापौर यांच्या मुलांची हत्येला पाच दिवस पूर्ण होत नाही तोवर दुसरा खुन त्याच परिसरात झाल्यामुळे जळगाव पून्हा हादरले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे.