जळगावातील मेहरुण परीसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात प्राणघातक हल्ल्यांचे सत्र थांबता थांबत नाही. काल शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास २५ वर्षीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणावर त्याच्या ओळखीच्या दोन इसमांनी त्याच्यावर कीरकोळ कारणावरून चाकूचे पाच ते सहा वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहरात खळबळ उडाली आहे.
पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (वय २५) रा. आदित्य चौक, मेहरुण असे मयत तरुणाचे नाव आहे. पवन उर्फ घातक सोनवणेवर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे दाखल आहेत. तसेच एकदा तो हद्दपार झाला होता. शनिवारी रात्री सागर खंडारे आणि विशाल सपकाळे यांनी कीरकोळ कारणावरून त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री कलम ३०७ प्रमाणे नोंद करण्यात आली होती. आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पवन सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.