पुत्र ठार तर पिता गंभीर जखमी
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : भुसावळ मधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ६:४५ वाजेच्या सुमारास जळगाव कारागृहात असलेल्या मुलाचा जामीन करून त्याला घरी नेत असलेल्या पितासह पुत्रावर मारेकऱ्यांनी भीषण हल्ला चढविला. यामध्ये नुकताच जेलमधून सुटून बाहेर निघालेला मुलगा ठार झाला असून पिता हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी पित्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुन्हेगारीमुळे पोलिसांची डोकेदुखी मध्ये वाढ झाली आहे.
याबाबत जखमी झालेला पिता मनोहर सुरळकर यांनी माध्यमांना आपबिती सांगितली. मागील वर्षी ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील कैफ शेख जाकीर याचा खून झाला होता. त्याच्या खुनाच्या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित धम्मप्रिया मनोहर सुरळकर हा जळगाव जिल्हा कारागृहात होता. दरम्यान मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या जामिनासाठी त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४७, राहणार पंचशील नगर,भुसावळ) हे आले होते. धम्माप्रियाचा जामीन झाल्यावर ते घराकडे परतत जात असताना नशिराबादच्या पुलाजवळ संशयित मारेकरी समीर शेख जाकीर, चादर वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) व आणखी एक जण दबा धरून बसले होते. दोघेही पितापुत्र पुलाजवळ आले असता त्यांनी अचानक दोघा पितापुत्रावर हल्ला चढविला. यात त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तर चोपर, चाकूने सपासप वार करीत पिता-पुत्रांना बचावाची संधी दिली नाही. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.
नशिराबाद परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी जखमींना सुरुवातीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. धम्मप्रिया सुरळकर हा मयत झाला असून त्याचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेवर लक्ष ठेवून असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शांतता आहे. सीएमओ डॉ.नीता पवार यांनी तपासून धम्माप्रिया सुरळकर त्याला मृत घोषित केले.