भुसावळ पुन्हा एकदा खुनाने हादरले
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील अयान कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाने त्याच्या पत्नीशी दुपारी जोरदार भांडण केले. हे भांडण सोडवण्यासाठी पत्नीचे वडील आणि कंडारी येथील तरुण हे रात्री घरी आले असताना तेथे वादविवाद होऊन संतापलेल्या पतीने धारदार चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्घुण हत्या केली. तसेच त्याच्या सासऱ्यावर देखील वार करून गंभीर जखमी केले आहे.

शेख समद शेख इस्माईल (वय ४०, रा.कंडारी ता.भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे नातेवाईक शेख जमील शेख शकूर (वय ५२, रा.धुळे) यांच्या मुलीचे अयान कॉलनी येथील संशयित आरोपी सुभान शेख भिकन याच्याशी लग्न झाले आहे.(केसीएन)दरम्यान शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी सुभान शेख याचे त्याच्या पत्नीशी जोरदार भांडण झाले. या भांडणाची माहिती महिलेने तिच्या पित्याला म्हणजेच शेख जमील यांना दिली. त्यांनी धुळे येथून भुसावळ येथे येत कंडारीचा समद शेख याला सोबत घेऊन मुलीचे घर गाठले. रात्री ८ वाजेच्या सुमारास सुभान शेख याला त्याचा सासरा शेख जमील व समद शेख हे समजावत असताना तेथे वादविवाद झाला.
या वादातून सुभान शेख याने संतप्त होऊन समद शेख याच्यावर धारदार चाकूने मानेवर, छातीवर, पोटावर जबर वार केले. तर सासरा शेख जमील यांच्यावर देखील चाकूने वार केले.(केसीएन)दोघेही गंभीर जखमी इसमांना भुसावळ येथील ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेख समद याला मयत घोषित केले तर जमील शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ काढले. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. संशयित आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
समद शेख याच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. हातमजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा भुसावळ तालुका हादरला असून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.









