जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी रात्री एका किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्याने ३२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागर अरुण बिऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर आणि एका व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपीने सागरला जोरात ढकलले. यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच कोसळला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
ग्रामस्थांनी सागरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सागरच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. ऐन तरुण वयात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव तालुका पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.








