पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे खुनाची घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुरंगी येथे पत्नी व अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्यास घरगुती वादातून लोखंडी रॉड व विटेने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमास ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यामध्ये पत्नी व अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.पत्नी व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विकास शंकर पाटील (वय ३७, रा. कुरंगी ता.पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पत्नी सोनाबाई विकास पाटील (वय ३२) व मुलगा कृष्णा उर्फ दादू विकास पाटील यांच्यासोबत राहत होता. घरात नेहमी कौटुंबिक वाद त्यांच्या सुरू होते.(केसीएन)रविवारी दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास त्याचे पत्नी व अल्पवयीन मुलाशी भांडण झाले. या भांडणात मुलाने पित्याच्या कंबरेवर, पाठीवर व मानेवर मारहाण केली. पत्नीने विटेने मारहाण केल्याने तो जखमी झाला.
त्यांच्या घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजारी असलेले मयताच्या नातेवाइकांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात जखमी प्रौढास दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी जळगाव येथे हलविण्यास सांगितले.
मात्र, नातेवाइकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यामध्ये पत्नी व अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत. (केसीएन)दरम्यान मयत विकास पाटील यांची पत्नी सोनाबाई पाटील हिला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून मुलाला बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहे.