संशयित पतीस अटक ;अमळनेर येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील मुंबई गल्ली मध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले होते. याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पती देविदासने केला.
मात्र एकंदरीत घटना पाहता व महिलेचा मृतदेहाचे निरीक्षण करून महिलेचा भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व नातेवाईकांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.
शहरातील मुंबई गल्लीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.
देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो. मुलबाळ नसल्याने तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण करीत होता. दोन तीन दिवसांपूर्वी योगिता चलथान, सुरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली होती. म्हणून योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे परत आली होती, अशी माहिती देखील समोर येत आहे.