भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जळगावच्या तरुणाचा खून
जळगाव प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहत असलेल्या तरुणाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर संशयित आरोपी हे जळगाव येथीलच असून त्यांच्या मागावर पोलीस रवाना झाली आहेत.
जितेंद्र राजेंद्र साळुंखे (कोळी वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पत्नी, तीन मुलांसह राहत होता. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, जळगाव शहरातील तीघांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी गावात एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.
यानंतर जितेंद्र कोळी याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले. जितेंद्रला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन) पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. जितेंद्र कोळी यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
या दरम्यान, रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, बाजार पेडणे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली होती .तसेच संशयित आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असून लवकर आरोपी अटक होतील अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.