मुंबई ( वृत्तसंस्था ) – कोळसा टंचाईमुळे विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच बंद पडले तब्बल 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

राज्यात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मागणी व उपलब्धता या समतोलासाठी सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच सध्या बंद आहेत. महानिर्मितीचे चंद्रपूर, वरणगाव (भुसावळ) व एकलहरे (नाशिक) हे प्रत्येकी 210 मेगावॅटचे व पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरु आहे. देशभरात मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. आज रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. कोयना धोरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कोळसा टंचाई असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.







