जिल्ह्यात २८ लाखांवर पाकिटे उपलब्ध
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी बुधवार दि. १५ पासून बीटी बियाणे विक्री होणार आहे. यंदा ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार आहे. यंदा २७ लाख ९२ हजार बीटी बियाण्यांची पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. ती जिल्ह्याला उपलब्ध झाली आहेत. मागील वर्षी ५ लाख ६२ हजार २६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर २१ लाख २३ हजार बीटी बियाण्यांची पाकिटे आली होती.
बुधवारपासून बीटी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. सुमारे १४ रुपयांची वाढ बीटी बियाण्यात झाली आहे. जिल्ह्यात यंदा ३ लाख २३ हजार ३०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यात युरिया १ लाख १ हजार ४००, डीएपी १५ हजार ५००, एमओपी २४ हजार, संयुक्त खते १ लाख १३ हजार २००, एसएसपी ७० हजार दोनशे असे एकूण तीन लाख २३ हजार ३०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तेही लवकरच उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावेत, जादा दराने बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री होत असेल, तर त्यावर नियंत्रणासाठी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत एक व १५ पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी एक, असे एकूण १६ ठिकाणी तक्रार निवारण कक्षाची स्थापना १५ मेपासून करण्यात येत आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची रजिस्टरमध्ये नोंद घेताना तक्रारदार शेतकऱ्याचे नाव, तक्रारीचे स्वरूप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ, शेतकऱ्यास केलेले मार्गदर्शन, त्याचा संपर्क पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक यांची नोंद घ्यावी. उचित कार्यवाहीसाठी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी गुण नियंत्रण निरीक्षकास दूरध्वनीद्वारे कळवावे. हे तक्रार निवारण कक्ष १५ मे ते १५ ऑगस्टपर्यंत खरीप हंगामाच्या सेवेत आहे. रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत कार्यरत राहणार आहेत.