जळगाव (प्रतिनिधी) – येथील खोटे नगर येथील तरुणीचा शनिवार दि. २४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये अकस्मात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

आरती साहेबराव बाविस्कर (वय ३३) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती सकाळी घरात बाथरूम मध्ये गेली होती. बराचवेळ झाला बाहेर आले नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा ढकलून पाहिले तर आरती बेशुद्धावस्थेत होती. कुटुंबीयांनी तत्काळ सहयोग क्रिटिकल दवाखान्यात तिला दाखल केले. मात्र दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सीएमओ डॉ. अजय सोनवणे यांनी तिला मृत घोषित केले.
त्यानंतर तिच्या मृतदेहावर शवागारात शवविच्छेदन करण्यात आले. आरती बाविस्कर यांच्या पश्चात दोन भाऊ, वहिनी, दोन भाचे असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच तिचे वडील आणि आई यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी आरतीचा मामेभाऊ धनराज सपकाळे हा पहुर पाळधी जवळील अपघातात मरण पावला आहे. त्यानंतर बाविस्कर कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,तिच्या हातावर साई व प्रसाद माफ करा असे लिहिले असल्याची माहिती आरतीच्या भावाने प्रसारमाध्यमांना दिली.







