रावेर तालुक्यातील घटना, ५ जणांवर गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी):- रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथे घरासमोरील सांडपाण्याच्या पाईपच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भूषण प्रकाश मोपारी (वय १८) यांच्या घरासमोर संशयित आरोपी समाधान रामदास पाटकर याने आपल्या घराच्या सांडपाण्याचा पाईप काढला होता. या कारणावरून भूषण मोपारी यांनी आरोपींना विचारणा केली असता, वादाला तोंड फुटले. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात आरोपी समाधान पाटकर याने फिर्यादी भूषण मोपारी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉडने मारून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेले साक्षीदार उखडू नारायण मोपारी यांच्या कपाळावर आरोपी क्र. २ याने बुक्कीने मारहाण केली, तर महिला साक्षीदार दुर्गा प्रकाश मोपारी यांना आरोपी क्र. ३ याने काठीने डाव्या हाताच्या दंडावर मारून दुखापत केली.
मारहाणीनंतर फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय घरात गेले असता, आरोपींनी “तुम्हाला तलवारीने कापून टाकू” अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या खिडकीवर दगडफेक करून काचा फोडल्या आणि घराचे नुकसान केले.या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यात समाधान रामदास पाटकर, अर्जुन रामदास पाटकर, विकास समाधान पाटकर, तुषार रामदास पाटकर, शुभम रामदास पाटकर (सर्व रा. खिरोदा प्र. यावल) यांचा समावेश आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. डॉ. विशाल जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक मनोज महाजन अधिक तपास करत आहेत. तपासाची जबाबदारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर रमजान तडवी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









