रावेर तालुक्यात होतेय उपक्रमाचे कौतुक
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम कळावे तसेच कागदी व कापडी पिशव्या पर्यावरण व आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी खिर्डी येथील अभिषेक पाटील माध्यमिक विद्यालय आणि ह. ल. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रवीण धुंदले यांनी प्लास्टिक मुक्तीचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
या आधीही धुंदले यांनी पाणी बचतीचर गावात विविध उपक्रम राबवले आहेत. इयत्ता सहावीच्या हिंदी विषयात ‘कागज की थैली’ हा द्वितीय सत्रातील सातवा पाठ आहे. विद्यार्थ्यांना पाठ शिकवला तसेच प्लास्टिक पिशव्यांपासून होणारी हानी विद्यार्थ्यांना पटवून दिली. प्रत्यक्षात कागदी आणि कापडी पिशव्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. याआधी शिक्षक प्रवीण धुंदले यांनी ‘बचत’ या पाठावर पाणी बचत, वह्यांच्या पानांची बचत, पैशांची बचत असे अनेक उपक्रम राबविले होते.