अनुभूती स्कूलमध्ये सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे उदघाटन
जळगाव (प्रतिनिधी) : ‘खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन काहीतरी नवीन शिकावे, खेळात चांगली कामगिरी करून पदके मिळवावे संधीचे सोने करावे…’ असे आवाहन सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अथिती तथा अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, महाराष्ट्र तायक्वांडो असोशिएशनचे अजित घारगे उपस्थित होते.
तायक्वांडो स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंनी शानदार मार्च पास्ट केले. त्यात बिहार आणि झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि अंदमान निकोबार, केरळ, कर्नाटक आणि गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा, उत्तर भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम भारत, पश्चिम बंगालचे संघ सहभागी झाले आहेत. मार्च पास्ट झाल्यानंतर मशाल ज्योत निघाली. प्राचार्य देबासीस दास आणि तायक्वांडोची राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेली शेजल श्रीमल हिने मशाल प्रज्वलीत केली. विविध खेळांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली मशाल ज्योत रन होऊन मुख्य ज्योत ज्योतीने लावली.
त्यानंतर तायक्वांडोची शेजल श्रीमल हिने खेळाडूंना शपथ दिली. प्राचार्य देबासीस दास यांनी ही स्पर्धा खुली झाल्याचे जाहीर केले. या उद्घाटन प्रसंगी अनुभती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘दिल ये जिद्दी है…’ हे गाणे सादर केले. त्याचप्रमाणे मैदानी आखाडा दांडपट्टेचे चित्तथरारक प्रात्यक्षिके रावेर येथील शिवफुले मर्दानी आखाडा या मुलींच्या ग्रुपने सादर केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य दास यांनी सांगितले की, सीआयएससीईद्वारा जुलै महिन्यात प्री-सुब्रतो राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या होत्या. त्यामुळेच ही राष्ट्रीय पातळीवरची तायक्वांडो स्पर्धा होत आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये १६ वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अनुभूती स्कूलच्या मैदानावर होणार आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भव्य अशी राष्ट्रीय योगासन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येत असल्याचे प्राचार्य दास यांनी सांगत स्पर्धेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या पलक सुराणा, सुमृद्धी कुकरेजा, अलेफिया शाकीर हे तीन खेळाडू १९ वर्षे आतील वयोगटात सहभागी होत आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी, १७ रोजी सकाळी ९ वाजता अनुभूतीच्या बँडमिंटन हॉलमध्ये क्रीडागण पूजन होऊन स्पर्धांना सुरुवात होईल.