एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खेडी शिवार, शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेन्सी येथे दि. १३ जानेवारी रोजी झालेल्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या घरफोडीतील दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख ९७ हजार १९९ रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खेडी परिसरात शंभू रेसिडेन्सीमधील रवींद्र मगरे यांच्या फ्लॅट क्रमांक ४ मधून दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते.(केसीएन) या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ विशाल कोळी आणि पोकॉ राहुल रगडे यांचे पथक नेमले होते.
या पथकाने केलेल्या तपासानंतर, गुन्ह्यातील संशयित आरोपी कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव (दोन्ही रा. सोनगीर, धुळे) यांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यांना ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(केसीएन)तपासादरम्यान, आरोपी कैलास मोरे याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी सोनगीर (ता. जि. धुळे) येथील त्याच्या घरी जाऊन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३ हजार ८१ हजार ५१४ रुपये किमतीची ३९ ग्रॅम सोन्याची लगड आणि १५ हजार ६८५ रुपये किमतीचे १३५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ९७ हजार १९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोकॉ निलेश पाटील हे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.