चोपडा तालुक्यात कुंड्यापाणी येथील प्रकार, दिवसा हिंस्त्र प्राण्यांचा धोका
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुंड्यापाणी येथे एसटी महामंडळाची बस जात नसल्यामुळे शाळा शिकणाऱ्या आदिवासी व इतर विद्यार्थ्यांना पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने जिल्हा प्रशासनाने बस सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कुंड्यापाणी गावाला दिवसातून २ फेऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या सुरु कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील बिडगाव ते कुंड्यापाणी या रस्त्यालगत पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर काटेरी झूडपे तसेच झाडांच्या फांद्याच्या अडथळा निर्माण होत असून बस चालकास बस चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून बस बिडगाव येथून पुढे नेण्यास अडथळा होत आहे. कुंड्यापाणी हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे अनेक वेळा हिंस्त्रप्राणी परिसरात वावरत असतात. म्हणून रस्त्याने विद्यार्थी पायी जात असताना जीव मुठीत धरून चालतात. तसेच विद्यार्थी हे शाळेत वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मिळत आहे.
रस्त्यामध्ये बरीच झाडेझुडपे आहेत. या झाडाझूडपांमुळे बस येत नाही. अनेकदा बसच्या काचा फूटतात. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई भरून द्यावी लागते, असे बस चालक सांगतात अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मुसा तडवी, पोलीस पाटील यांनी देखील, लवकर विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करावी. दिवसातून बसच्या कमीत कमी दोन फेऱ्या असाव्या अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उत्तम परिवहन नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.