जळगाव एलसीबीच्या पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी
अपहरणकर्ते हे गणेश राठोड यांना मारहाण करत त्याचे व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल त्यांच्या मुलाला पाठवून खंडणीची मागणी करत होते. अपहरणाची जागा निश्चित नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. (केसीएन)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी जयेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. नांदगाव) या दोन आरोपींची ओळख पटवली. ते नांदगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. संशयित आरोपी मनमाड रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर आरोपींनी दुचाकी सोडून शेतातून पळण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलिसांनी ५ किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, त्यांचे मित्र जनार्दन बाळू आवारे उर्फ राजू पाटील (रा. चाळीसगाव, हल्ली मु. डोंबिवली) आणि सोनू (पूर्ण नाव माहित नाही, रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून त्यांनी गणेश राठोड यांचे अपहरण केले होते. त्यांनी गणेश राठोड यांना मारहाण करून त्याचे व्हिडिओ त्यांच्या मुलाला पाठवले आणि ४५ लाखांची खंडणी मागितली होती. आरोपींनी गणेश राठोड यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा परिसरातील एका शेडमध्ये डांबून ठेवले होते.
आरोपींनी गणेश राठोड यांना विंचूर-लासलगावच्या जंगलात सोडले आणि उर्वरित दोन आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी तातडीने जंगलात शोध मोहीम चालवून जखमी अवस्थेतील गणेश राठोड यांना ताब्यात घेतले.(केसीएन)पकडलेल्या दोन आरोपींसह त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमोळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, मुरलीधर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, ईश्वर पाटील, भुषण पाटील, जितेंद्र पाटील आणि पोलीस दिपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.