मुंबई ( प्रतिनिधी ) – महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे शालिनी शर्मासह एक निलंबित पोलिस अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
चेंबूर पोलीस ठाण्यात शालिनी शर्मा एक वर्षापूर्वी कार्यरत होत्या. निलंबित पोलिस अधिकारी अनिल जाधव आणि त्यांचा हस्तक राजु सोनटक्के अशी इतर आरोपींची नावे आहेत. अनिल जाधव याने अन्य एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
गुन्हे शाखेने तक्रारीची शहानिशा करुन चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणुकीस असतांना शाहीन बाग आंदोलन प्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याशी खटका उडाल्यावर त्यांची अनपेक्षित बदली सुद्धा चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.