खान्देशातील पहिल्या ॲक्युपंक्चर शैक्षणिक परिषदेत त्या बोलत होत्या. हर्षस्पर्श हेल्थकेअर अँड पॅरेलिसिस सेंटर, शिंदखेडा यांच्यातर्फे रविवारी दि.१० ऑगस्ट रोजी जळगाव येथील पत्रकार भवन येथे एक दिवसीय ॲक्युपंक्चरमधील ॲडव्हान्स थेरपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील १०० हून अधिक नोंदणीकृत ॲक्युपंक्चर तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.
या परिषदेत बोलताना ॲक्युपंक्चर थेरपिस्ट वैशाली सोनवणे म्हणाल्या की, भारतात कान टोचणे, पैंजण घालणे, बांगड्या घालणे यांसारख्या परंपरांमागे शरीरातील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन उपचार करणे हाच उद्देश होता. आजही अनेक भारतीयांचा समज आहे की काही आजार फक्त औषधांनीच बरे होतात. मात्र ॲक्युपंक्चर थेरपी ही औषधांशिवाय उपचार करणारी प्रभावी पद्धत आहे आणि ती खूप लवकर गुण देते. यावेळी, परिषदेचे प्रशासक डॉ. रुमी बेरामजी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. मुंबईचे प्रशिक्षक ॲलेक्स अलेक्झांडर यांनी ‘ऑरिक्युलर थेरपी’बद्दल माहिती दिली. तर उमेश पळशीकर यांनी ॲक्युपंक्चर क्लिनिक सुरू करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच, सुवर्णा वाणी यांनी ‘ची’ (प्रतिकारशक्ती) ऊर्जा वाढवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत, यावर सविस्तर माहिती दिली. या परिषदेत ॲक्युपंक्चरचे महत्त्व, कपिंग थेरपी आणि नोंदणी प्रक्रियेची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. भविष्यात संधिवात, लकवा, मधुमेह यांसारख्या विषयांवरही कार्यशाळा आयोजित केल्या जातील, असेही वैशाली सोनवणे यांनी सांगितले. सूत्रसंचालन ॲक्युपंक्चरिस्ट डॉ. प्रतिभा कोकांदे यांनी केले. ॲक्युपंक्चर थेरपीला सरकारने मान्यता दिली असून, आता ॲक्युपंक्चर कौन्सिलचीही स्थापना झाली आहे. ही थेरपी आता जगभरात लोकप्रिय झाली आहे, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.
ॲक्युपंक्चर थेरपी ही पद्धत जेव्हा भारतातून विदेशात गेली तेव्हा त्यावर खूप संशोधन होऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ॲक्युपंक्चर थेरपी विनाऔषधीने होत असून रुग्णावर तिचा लवकर गुण येतो. यावेळी वक्त्यांनी प्रोजेक्टरवर प्रात्यक्षिकद्वारे उपस्थितांना ॲक्युपंक्चरचे महत्व, कपिंग थेरपी,उपचार पद्धती,नोंदणी प्रक्रिया,सामान्य गुंतागुंती अशा विविध बाबींची उदाहरणासह सविस्तर माहिती देण्यात आली.