चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक निलंबित
अमळनेर (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करून त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडल्याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सज्जनसिंह नार्हेडा असं निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यासह खान्देशात खळबळ उडाली आहे.
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या गुन्हा दाखल होता. याप्रकरणात संशयित म्हणून तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडाने पोलीस स्टेशनला बोलावले होते. यानंतर या तिघा तरुणांना अंगावरचे कपडे काढून त्यांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केली. यावेळी या तिघा तरुणांना नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा याने पोलीस स्टेशनमध्ये केल्याचे म्हटले जात आहे.
एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एका संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणांच्या कुटुंबीयांसह एका संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा याला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.