आ. एकनाथराव खडसे यांची महत्त्वाची माहिती
जळगाव(प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथील निवासस्थानी झालेल्या जबरी चोरी प्रकरणात आ. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
परवा मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगरमधील घरी जबरी चोरी झाली. सुरुवातीच्या माहितीत, घरातून सात ते आठ तोळे सोने आणि ३५ हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समोर आले. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून, चोरट्यांनी अवघ्या एका तासात हातसफाई केल्याचे त्यात दिसत आहे.
या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ८६८ ग्रॅम एवढे सोने आणि ३५ हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरला आहे. घटनेची माहिती मिळताच, श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून घटनास्थळी तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेची तसेच पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
आज एकनाथ खडसे यांनी जळगावातील निवासस्थानी भेट देऊन चोरीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जो आरोप केला, त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे भुरट्या चोरांचे काम नाही.”
खडसे यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, “चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून ही चोरी केली आहे. त्यांचा उद्देश केवळ सोने-चांदी किंवा रोख रक्कम चोरणे हा नव्हता, तर माझ्या घरातील भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे,महत्त्वाच्या सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच ही चोरी झाली आहे.”
खडसे यांनी दावा केला की, चोरट्यांनी घरातील दहा महत्त्वाच्या सीडी चोरल्या असून, सुदैवाने उर्वरित सात सीडी शिल्लक राहिल्या आहेत. इतकेच नाही, तर घरातील सर्व २५ ते ३० पेन ड्राईव्ह देखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत. खडसे यांनी थेट कुणाचेही नाव घेतले नसले, तरी “ज्या पद्धतीने ही चोरी झाली, ती कुणाच्या सांगण्यावरून झाली का?,” असा सूचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा घेणार नाही,” असे म्हणत त्यांनी राजकीय विरोधकांकडे बोट जात असल्याचे सूचित केले.
आता आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या सीडी आणि कागदपत्रे आपण पोलिसांना दाखवणार असून, त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे आता पोलीस तपासाला नवी दिशा मिळाली आहे.









