चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चहार्डी येथील पाण्याच्या खदानीत तोल जाऊन पडल्याने एका ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज भगवान पाटील (वय ३३, रा. गणपूर, ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मनोज पाटील हा आज बुधवार दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चहार्डी येथील एका पाण्याच्या खदानीजवळ होता. अज्ञात कारणाने त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट खदानीतील खोल पाण्यात पडला.(केसीएन)पाण्यात पडल्यानंतर त्याला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील काही तरुणांनी तात्काळ धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले.
त्यानंतर मनोजला तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मनोज पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गणपूर गावात शोककळा पसरली आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप भोई हे करत आहेत.