पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बोरी नदी केटीवेअर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेला पंधरा वर्षीय मुलाचा पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिरालाल सुनील पवार (रा. टोळी ह.मु. पिंप्री) असे मृत मुलाचे नाव आहे. हिरालाल आणि त्याचा भाऊ भोजराज हे दोघं दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावा जवळील बोरी नदी बंधाऱ्यावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. आंघोळ करताना हिरालालचा पाय घसरून तो पाण्यात पडला तर तो वर आलाच नाही. घरी जाऊन दुसऱ्या भावाने आईला निरोप दिल्याने आईसह ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेऊन देखील तो आढळून आला नाही.
शुक्रवारी सकाळी पुन्हा ग्रामस्थ व पोलिसांचा मदतीने हिरालालचा शोध घेतला असता तो बंधाऱ्याजवळील दगडांच्या कळपात आढळून आला. त्याला कुटीर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काका अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









