लोकप्रतिनिधींचे सामूहिक यश : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगांव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असून केंद्र शासनाने १०० कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली असून, यामुळे जिल्ह्यातील केळी शेतीला नवा आयाम मिळणार आहे. ही योजना जिल्ह्याला महाराष्ट्रातील केळी उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कोल्डस्टोरेज आणि वेअरहाऊस साठी अनुदान – केळीची योग्य साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कोल्डस्टोरेज व वेअरहाऊस उभारणीसाठी सरकार ५०% अनुदान मिळणार असून शेतमाल वाहतूक सुविधा सुधारणा – केळीची वाहतूक सुलभ करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जाणार असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, व शेतकरी गटांना लाभ होण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्ह्याच्या केळी उत्पादकांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, आ .प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ.अनिल पाटील, आ.मंगेश चव्हाण यांची मोलाची साथ लाभली. जिल्ह्यासाठी केळी विकास महामंडळाची संकल्पना यासोबतच जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेल्या केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून कोल्डस्टोरेज आणि वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याचा विचारही सरकार करत आहे असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.