जळगाव (प्रतिनिधी) :- वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ परिसरात ‘वंदे मातरम’ या गीताचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे.
मा. राज्यपाल कार्यालयाचे अवर सचिव यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम घेण्यात येत असून, देशभक्तीच्या वातावरणात संपूर्ण विद्यापीठ परिसर दुमदुमणार आहे. या वेळी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळांचे संचालक, शिक्षक, प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतचे परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी निर्गमित केले असून, या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय अभिमान व देशप्रेम जागृत करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.









