जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने माहिती अधिकार अधिनियम २००५ ची माहिती स्वत:हून जाहीर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत.
नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती सहज व सुलभ पध्दतीने मिळावी. यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू करण्यात आलेला आहे. अधिनियमातील कलम ४ अन्वये नागरिकांना माहितीचा अधिकार मिळणे सोईचे होईल अशा रितीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रितीने सूचिबध्द करील असे निर्देश देण्यात आलेले आहेत. नागरिकांना माहिती सुलभतेने मिळण्यासाठी माहिती स्वयंप्रेरणेने प्रकट करणे आवश्यक आहे.
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणे व शासनयंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे हा माहिती अधिकार अधिनियम २००५ चा मूळ उद्देश सफल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, जन माहिती अधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न करावेत.असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.