पशुचोरीच्या घटना वाढल्या, जळगाव तालुक्यातील पाथरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाथरी येथील एका शेतकऱ्याच्या खळ्यातून १२ बकऱ्या इंडिका कारमध्ये घालून अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दि. २७ जून रोजी पहाटे घडली आहे. घटनेत पशुपालकांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडू लोटन धनगर (वय ५०, रा. पाथरी ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गावातील बस स्टॅन्ड जवळ त्यांचे घर आहे. तेथे एका खळ्यात त्यांच्या ६ मोठ्या व ६ लहान अशा १२ बकऱ्या, त्यात ३ बोकड असे बांधून ठेवण्यात आल्या होत्या.(केसीएन)गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जागी होऊन पाहिले तर एका लाल रंगाच्या इंडिका कारमध्ये अज्ञात चोरटे बकऱ्या कोंबत असल्याचे त्यांना दिसले. ते पाहून त्यांनी शेजारील उत्तम महाजन यांना आवाज दिला. तसेच दोघांनी इंडिका कारला अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र दोघांनाही कट मारून इंडिका कार सामनेर, नांद्रा, पाचोरा मार्गे भरधाव निघून गेली. नंतर पशुपालक दगडू धनगर व उत्तम महाजन यांनी दुचाकीवर कार शोधण्याचा पाचोरपर्यंत प्रयत्न केला.(केसीएन)मात्र तो असफल ठरला. नंतर त्यांनी शुक्रवारी दि. २८ जून रोजी सकाळी भडगाव येथेही बाजारात शोधले. मात्र बकऱ्या दिसल्या नाहीत. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पशुधन चोरीच्या घटना सातत्याने घडत असून पशुपालकांचे नुकसान होत आहे.