प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांचे प्रतिपादन
‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले असतात. बंद मुठ म्हणजे पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे परिणाम घेऊन जन्माला येतो. मृ्यूनंतर कुणीही काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. याचे चपखल उदाहरण पटवून देताना जगज्जेता सिकंदरचे उदाहरण देण्यात आले. संपूर्ण जग त्याने जिंकले परंतु मृत्यूनंतर त्याला काहीही सोबत नेता आले नाही, असे प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.
हा संदेश जगाला देण्यासाठी त्याने अंतिम इच्छा अशी व्यक्त केली होती की, अंतिमसंस्कारासाठी शव नेत असताना मोकळे, रिते हात दिसतील असे ठेवा की ते लोकांना दिसतील. कुणीही सोबत काही नेत नाही सोबत जातात त्याने केलेले कर्म! व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला आपले स्वतःचे कर्मच जबाबदार असतात. हा अत्यंत मोलाचा संदेश सुमधूर गितांच्या माध्यमातून प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी तर आस्तिक, नास्तिक तसेच सुदेव, सुगुरू आणि सुधर्म या सह ‘संकीत के ६७ बोल’ यावर प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी सोदाहरण उदाहरणे देऊन उपस्थित श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले. आपल्या प्रवचनात संकीत के ६७ बोल याबाबत पुढील प्रवचनात सविस्तर सांगण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शरीर आणि आत्मा हे विभिन्न आहेत हे समजून घेण्यासाठी जिनवाणी श्रद्धापूर्वक ऐकावी असे आवाहन देखील प्रवचनातून करण्यात आले.