जळगाव ( प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील देवगाव येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली.
दिलीप ओंकार मराठे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आमदार चिमणराव पाटील यांचे गाव असलेल्या देवगावात ही घटना घडली शेतकरी दिलीप मराठे यांनी गावातील विकास सोसायटीकडून एक लाखांचे कर्ज काढले होते. उसनवारीचे त्यांनी दोन लाख रुपये घेतले होते.दोन वर्षांपासून दुष्काळ, तसेच यंदा अतिवृष्टीमुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले.तेथेच त्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
घटनेची माहिती कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवली. लहान मुलगा योगेश पाटील व इतरांनी त्यांना कुटीर रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. पारोळा पोलिसात योगेश पाटील यांनी फिर्याद दिली.