सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना
सोयगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जरंडी येथील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आर्थिक विवंचनेत असलेल्या ४७ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली. सोयगावचे पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर, सादिक तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. सोयगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र मोतीराम घनघाव (वय ४७) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. जरंडी शिवारात त्यांची गट क्र. २८० मध्ये ५ एकर शेती आहे. खरिपात झालेले नुकसान आणि रब्बीतही बाधित झालेल्या पिकांची अवस्था पाहून कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्यावर युनियन बँकेचे पीककर्ज ३ लाख रु. आणि खासगी कर्ज ३ लाख रु. असे ६ लाखांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली. महसूलच्या पथकानेही घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.