रावेर तालुक्यातील कर्जाद शिवारातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कर्जाद शेती शिवरात अज्ञात चोरट्यांनी वीज वितरण कंपनीची ६० हजारांची सुमारे साडेपाच हजार मीटर वीज तार चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कर्जाद शेत शिवारातील बऱ्हाणपूर रस्त्यावर वाघोडच्या अजय ज्ञानेश्वर पाटील यांचे शेत (गट नंबर ४३०) आहे. या शेतामधील दोन ट्रान्सफार्मर दरम्यान असलेल्या १३ पोलवरील ६० हजार रुपये किमतीची सुमारे ५ हजार ७६० मीटर लांबीची अॅल्यूमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी दि. ४ जुलै रोजी चोरून नेली. याबाबत कर्जाद वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मुकेश ठाकरे यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कॉस्टेबल सुनील वंजारी करत आहेत.