पाचोरा शहरातील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) : – घरावर कर्ज घेतलेले असतानाही घराची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी घरमालकाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा दि. १६ रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल झाला आहे.
घर विकत घेणारे फिर्यादी असिफ अली मुनाफ अली बागवान (रा.बाहेरपुरा, पाचोरा) यांनी एजंट मार्फत त्यांच्यासह तिघा भावांच्या नावे पाचोरा येथील सिटी सर्व्हे हद्दीतील सिसन ३०१९/ ब / ३८ पैकी क्षेत्र ३.२६ चौमी. हे गोरख खुशाल पाटील यांच्याकडून खरेदी केले. त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ३०१/२०२४ दि. ११ जानेवारी २०२४ रोजी खरेदीखताने नोंदवून विकत घेतले. त्याच दिवशी त्याच मिळकतींपैकी उत्तरेकडील क्षेत्र २२३ चौ. मी. आकाश गोरख पाटील यांच्या मालकीचे क्षेत्र १३९.३६चे घर हे दस्त नंबर ३०७/२४ नुसार २२ लाख २१ हजार रुपयाला फिर्यादीसह तिन्ही भावांचे नावे खरेदीखताने विकत घेतले व सिटी सर्व्हे रेकॉर्डला १८ मार्च २०२४ ला नावे लागले.
मात्र, जळगाव येथील फेडेबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जळगाव या बँकेचे मॅनेजर व वसुली अधिकारी यांनी घराचे कर्ज थकल्यामुळे जप्तीसाठी धाड टाकली. त्यावेळी हे घर विक्री झाल्याचे आढळून आले. त्या घरावर २० लाख दोन हजार रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने आसिफ अली यांना दिली.
गोरख खुशाल पाटील व त्यांचा मुलगा आकाश गोरख पाटील (दोघेही रा. भडगाव रोड, पाचोरा) यांनी बँकेचा मिळकतीवर बोजा असताना परस्पर खरेदीखत नोंदवून असिफअली व त्यांच्या तिघा भावांची फसवणूक केली आहे. यामुळे असिफ अली यांच्या फिर्यादीवरून गोरख खुशाल पाटील व आकाश गोरख पाटील यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.