एरंडोल तालुक्यात भालगाव रस्त्यावरील घटना, कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपा पदाधिकारी दशरथ बुधा महाजन यांच्या दुचाकीला चारचाकीने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी भालगाव-बोरगाव रस्त्यावर घडली.

दशरथ महाजन हे दि. १२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर नामदेव महाजन (रा. भालगाव) यांच्यासह पोल्ट्रीच्या बांधकामांच्या ठिकाणी भालगाव-बोरगाव रस्त्यावरून निघाले होते. पुढे एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दशरथ महाजन हे गंभीर जखमी झाले. त्यांचा डावा डोळा पुर्णपणे निकामी झाला असून त्यांच्या दोन्ही बाजुच्या ७ बरगड्या फ्रैक्चर आहेत. तसेच त्यांच्या डोक्याला व मेंदूला देखील इजा झालेली आहे. त्यांचे दोन्ही पाय तीन ठिकाणी फॅक्चर झालेले आहेत.(केसीएन)विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे तपासणीत डॉक्टरांना आढळून आले. सध्या त्यांच्यावर शहरातील अग्रवाल चौकातील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी कल्पना दशरथ महाजन यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









