जळगाव विद्यापीठासमोर महामार्गावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एका अज्ञात कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली असून, अज्ञात कारचालकाविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश विश्वास नन्नवरे (वय ४२, रा. बांभोरी, ता. धरणगाव) आणि त्यांचे मित्र भिकन शामराव नन्नवरे हे दोघे जखमी झाले आहेत. जगदीश नन्नवरे हे आपल्या मित्रासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीआर ७०७०) वरून पाळधी येथून बांभोरीकडे येत होते. त्याचवेळी, विद्यापीठाच्या गेटजवळ एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवावे लागले.
अपघात घडल्यानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून लगेच फरार झाला. या प्रकरणी जगदीश नन्नवरे यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार हे करत आहेत.