धरणगाव तालुक्यातील दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील मुसळी ते चिंचपूरा गावाच्या दरम्यान भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेत १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील किर्तनकार हे किरकोळ जखमी झाले आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला होता.
राज महेंद्र शिरसाट (वय १८ रा. सार्वे ता. धरणगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. सार्वे गावात राज शिरसाट हा आपल्या आई आणि आजी आजोबांसोबत वास्तव्याला होता. आई मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर राज शिरसाट हा शिक्षण घेत होता. त्यांच गावात त्यांचे मामा देखील राहतात. गुरूवारी ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाट हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे उर्फ सार्वेकर महाराज यांच्या कार क्रमांक (एमएच ०९ डीएक्स ८९९१ ) ने सार्वे गावातून जळगावला जाण्यासाठी निघाले.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जात असतांना त्यांची कार अचानक झाडाजवळ फेकली गेली. या अपघातात राजचा जागीच मृत्यू झाला. तर सार्वेकर महाराज हे जखमी झाले. रोडच्या बाजूला शाळेतील शिक्षक डी.के.पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून राजला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.