‘लोभी, चंचल व्यक्ती खोटे बालत असतात, असे आगम मध्ये सांगण्यात आलेले आहे. खोटे बोलणे हा मोठा दुर्गुण सांगण्यात आलेला आहे. असे म्हणतात की, क्रोधाचे डोळे मागे असतात, भय असलेल्याचे डोळे पुढे आणि लोभी असलेल्यांना तर आंधळे म्हटलेले आहे, त्यांना डोळे नसतात मुळी! आत्मकल्याण साध्य करायचे असेल तर करण सत्य, योग सत्य आणि भाव सत्य यांचा स्वीकार करायला हवा…’ याबाबतचे भाष्य परमपुज्य सुमितमुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात केले.
कालच्या प्रवतनापासून अणुव्रत या विषय संदर्भाबाबत ते मार्गदर्शन करीत आहेत. असे म्हटले जाते की, ‘’सत्य’ और ‘अहिंसा’ मोक्ष उडान के दो पंख!’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. सत्याचा स्वीकार केला तर जीवनात कसे परिवर्तन घडून येते याबाबतची रंजक गोष्ट महाराज साहेबांनी उपस्थितांना सांगितली. चोरी, खोटे बोलणे, परस्त्री गमन, व्यसन, अवगुण आणि वाईट असलेल्या युवकामध्ये साधुंनी सत्य आचरण करण्याची शिकवण, शपथ दिली आणि तो कसा सुधारला ते सांगण्यात आले. एक खोटे हे यापूर्वी केलेल्या सर्व सत्य आणि चांगुलपणाला पुसून टाकते. दुधात लिंबूचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध नासते, फाटते तसे काहीसे खोट्या गोष्टीविषयी म्हणता येईल. असत्य आचरण असेल तर त्या परमात्म्याशी मिलन कसे होऊ शकेल. बोलतो काही आणि त्याची कृती काही असेल तर त्याला कोणताच अर्थ नसतो. जीवनात खऱ्या अर्थाने चांगले करून घ्यायचे असेल तर स्वाध्याय म्हणजे ‘स्व’ चा अध्याय करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रभुद्वारा मिळालेला फॉर्म्युल्याचे उत्तम पालन करा. मानवाच्या इच्छांना तर अंतच नसतो.दहावी उत्तम गुणांनी पास व्हावे, नंतर नोकरी लागवी, चांगल्या घरची मुलगी पत्नी म्हणून लाभावी, मुलं व्हावे, त्यांचे चांगले व्हावे, नात- नातू व्हावे या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत त्या वाढतच जातात. यावर उपाय म्हणजे ईश्वराने सांगितलेल्या मार्गानुसार वागा, असा मोलाचा सल्ला परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी दिला.
स्वाध्याय भवन, जळगाव
शब्दांकन – किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव