चिन्या जगताप हत्याप्रकरणी आठ दिवसात कारवाई करणार :
तुरुंग उपमहानिरीक्षकांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहात झालेल्या बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांच्या हत्येप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात ५ दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. यातील संशयित आरोपी तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी यांचेसह इतर कर्मचारी कर्तव्यावरून फरार झालेले आहेत. तर चिन्या जगताप हत्येप्रकरणी औरंगाबाद तुरुंग उपमहानिरीक्षक कार्यालयात अहवाल आलेला असून पुढील आठ दिवसात दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी “केसरीराज”शी बोलताना दिली.
न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या चिन्या जगताप हत्याकांडात न्यायालयाच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान , तब्बल १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे . आरोपी चाणाक्ष आहेत, ते आता पळून जाऊ शकतात त्यामुळे आता वेळ वाया न घालवता पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप यांनी केली आहे.
जिल्हा कारागृहात ११ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगताप या कैद्याचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. मात्र पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला होता.
पोलीस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका ( क्रमांक – १७०६ / २०२० ) दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे . चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे .
याप्रकरणी नशिराबाद येथे दाखल गुन्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे वर्ग झालेला आहे. पेट्रस गायकवाड हे धुळे कारागृह येथे, अरविंद पाटील हे भुसावळ कारागृह तर जितेंद्र माळी, अण्णा काकड, दत्ता खोत हे जळगाव कारागृहात सद्यस्थितीत कर्तव्यावर आहेत. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून ते नोकरीच्या ठिकाणाहून कर्तव्य सोडून फरार झालेले आहेत. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले की, संशयित आरोपींच्या घरी, सरकारी निवासस्थानी पोलिसांनी शोधाशोध केली आहे. सर्व संशयित हे फरार झालेले असून पोलीस पथक त्यांना शोधत आहे. तर तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी “केसरीराज”शी बोलताना सांगितले की, सदर गुन्हा हा गंभीर असून संशयितांविरुद्ध औरंगाबाद डीआयजी कार्यालयात अहवाल आलेला आहे. तो अहवाल पाहून आठ दिवसात संशयितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.