गुजरातच्या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सांवळ प्रिप्री येथील एका कापूस खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची गुजरातच्या पाच जणांनी संगनमत करून ७ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुभाष पांडुरंग पाटील (वय ५५, रा. सांवळ प्रिप्री, ता. पाचोरा) यांचा शेतीसह कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये, त्यांनी दलाल शाहिद बशीर मुसलमान (रा. घटनांद्रा, ता. सिल्लोड) आणि जितुभाई जेठालाल यांच्या मध्यस्थीने गुजरात येथील ‘आदेश कॉटन जिनिंग’ (जलालपुरा रोड, ता. गठाला, जि. बोटाद, सौराष्ट्र) या फॅक्टरीला कापूस विक्रीचा व्यवहार केला होता. सुभाष पाटील यांनी २६ आणि २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण तीन ट्रकमध्ये २९१ क्विंटल ७७ किलो कापूस पाठवला होता. या कापसाची एकूण किंमत २१,१२,५९० रुपये इतकी होती. त्यापैकी आरोपींनी १४,०७,५९० रुपयांचे पेमेंट दिले,
मात्र उर्वरित ७,०५,००० रुपये देण्यास टाळाटाळ केली. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आणि दलाल व जिनिंग मालकांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. पाटील यांच्या फिर्यादीवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:०८ वाजता पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानुसार संशयित आरोपी रमेशभाई (जिनिंग मालक), धवलभाई (जिनिंग मालक), कुलराजभाई, जितुभाई जेठालाल (मध्यस्थ), शाहिद बशीर मुसलमान (दलाल, रा. सिल्लोड) यांचा शोध सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्यापाऱ्यांनी कापूस विक्री करताना अनोळखी दलाल आणि परराज्यातील मालकांची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









