जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील शेरी व पहूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची १२ लाखात फसवणूक करणारा व्यापारी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन पकडून आणला आहे.
पहूर बाजारपेठेच्या गावी या आरोपीने ११ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा १४३ क्विंटलपेक्षा जास्त कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता . कापूस खरेदीचे पैसे न देता तो १२ नोव्हेंबररोजी तो निघून गेला होता . १९ नोव्हेंबररोजी त्याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांनी पो उ नि अमोल देवडे , स फौ अशोक महाजन , हे कॉ लक्ष्मण पाटील , पो ना रणजित जाधव , किशोर राठोड , कृष्ण देशमुख , विनोद पाटील , ईश्वर पाटील , मुरलीधर बारी , पहुरचे पो उ नि संजय बनसोडे यांचे पथक बनवून त्यांच्याकडे तपास सोपवला होता .
या पथकाने आरोपीची माहिती मिळवत त्याचा शोध घेतला . आशिषभाई रमणीकभाई हिंगेरिया ( रा – राजकोट शहर , गुजरात ) असे या आरोपीचे नाव आहे . त्याला राजकोट येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याच्या ताब्यातून या गुन्ह्यात वापरलेला ७ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले . या आरोपीला पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.