देवदूत ठरलेल्या कॉन्स्टेबल तरुणीचा ग्रामस्थांनी केला सत्कार ; जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : गिरणा नदीपात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेला असताना एक ११ वर्षीय मुलगा काठावरून पाय घसरून पडला. हि घटना कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी पाहिली. त्यांनी क्षणार्धात वर्दीवर असतानाही गिरणेत उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. हि घटना आज रविवारी दि. ८ रोजी तालुक्यातील कानळदा येथे सकाळी घडली आहे. मुलाचा जीव वाचविला म्हणून कानळदा ग्रामस्थांतर्फे महिला कॉन्स्टेबलचा जाहिर सत्कार करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कणवाश्रमात ऋषिपंचमी निमित्त दरवर्षी महिला भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी असते. महिला भाविक नदीमध्ये आंघोळ करून महर्षी कण्वऋषींच्या गुफेमध्ये पूजा करतात. दर वर्षाप्रमाणे यावर्षीही हजारोंच्या संख्येने महर्षी कण्वाश्रमात व नदिकाठावर महिलांची वर्दळ होती. (केसीएन) सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन पूर्व कल्पना देऊन विशेष बंदोबस्तची विनंती केली होती. त्यासाठी तालुका पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष करून महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त पुरवलेला होता.
दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता हजारो महिला आश्रमाला लागून असलेल्या घाटावर आंघोळ करत असताना एक ११ वर्षीय मुलगा पूजेमध्ये असलेले पैसे उचलण्यासाठी आलं होता. अचानक हा मुलगा नदी काठावर गेला असताना पाय घसरून पडला व नदीमध्ये बुडू लागला. यावेळी महिलांनी आरडाओरडा केला. हे महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी पाहिले. (केसीएन)त्यांनी मुलगा पाण्यात बुडत असल्याची खात्री पटताच क्षणाचाही विलंब न करता अंगावरील वर्दीवरच स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. त्याचे प्राण वाचविले. या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक, महर्षी कणवाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलात नुकतीच नवीन कॉन्स्टेबल भरती झाली आहे. त्यातून नवनियुक्त महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा कैलास चौधरी यांनी मुलाचा जीव वाचवून वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. यावेळी महर्षी कनवाश्रमाचे पूज्य अदैत्वानंदजी सरस्वती महाराज, पीएसआय गणेश सायकर, हेकॉ अनिल फेगडे, हेकॉ अनिल मोरे, सुनील पाटील, पोपट सोनार, कॉ. ज्योती साळुंखे, उपस्थित महिला व परिसरातील लोकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.