जळगाव;- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ वाचन व कविता गायन करून बालभारतीचा गौरव केला.काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळांची सुरुवात २७ जानेवारी रोजी झाली. याच दिवशी बालभारतीचा वर्धापन दिन असल्याने जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठांचे वाचन व कविता गायनाचा उपक्रम घेण्यात आला. बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, सुनंदा रोझतकर, साधना सुर्यराव, ज्योती वाघ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मास्क देण्यात आले. मुख्याध्यापक संतोष वानखेडे यांनी कोरोना विषाणूपासून बचाव कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केले.








