गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय अंतिम वर्ष यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी एक कमी किमतीची, केवळ २८,००० मध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक स्कूटर यशस्वीरित्या डिझाईन व फॅब्रिकेट केली आहे.
डिझाईन अॅण्ड फॅब्रिकेशन ऑफ इलेक्ट्रिक स्कूटर या शीर्षकाखाली भाग्यश्री दिलीप विसपुते, निरज संजय हिंगणे, वैभव दिगंबर पाटील, सुमेध प्रशांत देशमुख, योगेश गणेश पाटील व भूपेश विजय पाटील या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला असून, विशेष म्हणजे केवळ २८,००० इतक्या कमी खर्चात ही ई-बाईक विकसित करण्यात आली आहे.ही ई-बाईक २५ किमी/तास इतकी कमाल वेगाने धावते आणि एकदा चार्ज केल्यावर ३० किमी अंतर पार करू शकते. ही गाडी प्रदूषणमुक्त व देखभाल सुलभ असून शहरी भागातील लहान अंतरासाठी उपयुक्त आहे. या प्रकल्पात सोपी व खर्चिकदृष्ट्या फायदेशीर रचना तयार केली आहे.या ई-बाईकचा डिझाईन सीएटीएआय या सॉफ्टवेअरचा वापर करून करण्यात आला असून, त्यानंतर डिझाईनचे सिम्युलेशन करून प्रत्यक्ष फॅब्रिकेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, या स्कूटरसाठी लागणारी बॅटरी युनिटदेखील विद्यार्थ्यांनीच तयार केली असून, त्यात ६००० एमएएच क्षमतेच्या लिथेनियम आर्यन सेलचा समावेश आहे, आणि ही युनिट यशस्वीरित्या चाचणी घेतल्यानंतर वापरण्यात आली आहे. काही घटक (जसे की फाइबरचे पार्ट्स) ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. तुषार कोळी (विभागप्रमुख, यांत्रिक अभियांत्रिकी) व प्रा. किशोर एम. महाजन यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. उपक्रमामुळे स्वस्त, टिकाऊ व पर्यावरणपूरक वाहननिर्मितीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे.यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव),डॉ.केतकी पाटील(सदस्य),डॉ.वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ.अनिकेत पाटीलयांनी कौतुक केले आहे.