सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक येत्या दि. १६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापकअध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.
यासंबंधी राज्य पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पुण्यात झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीला राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच उज्ज्वला गोकुळे, जिल्हा समन्वयक सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, संगणक परिचालक संघटनेचे राज्य संघटक संतोष कुडले, सचिन जगताप, संदीप पाटील, राजू जंगम, रईस पटेल, शरद बाबर आदी उपस्थित होते. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार, संगणक परिचालक आदी संघटनेचा या काम बंद आंदोलनात सहभाग आहे.
जवळपास अडीच ते तीन लाख लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. याचा परिणाम राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींवर होणार आहे. नियमित व सन्मानजनक मानधन, भत्ता मिळावे, सरपंचांना १५ हजार, उपसरपंचाना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे, ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे, मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी आदी प्रमुख मागण्या आहेत.