शिवतीर्थ परिसरातील गटार कामाची प्रत्यक्ष पाहणी
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील शिवतीर्थ आणि सैनिकी वसतिगृह परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. या भागातील जुनी भूमिगत गटार लाईन अपुरी पडत असल्याने, त्याठिकाणी मोठी पाईप लाईन टाकण्याच्या कामाची महापौर दीपमाला काळे आणि नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


शिवतीर्थ परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचं प्रमाण पाहता, येथील जुनी भूमिगत गटार व्यवस्था छोटी पडत होती. यामुळे अनेकदा सांडपाणी तुंबण्याचे किंवा दुर्गंधीचे प्रकार घडत होते. ही समस्या लक्षात घेऊन महापौरांनी येथे मोठी गटार लाईन टाकण्याचे निर्देश दिले होते. या कामाला आज सकाळी १० वाजेपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. पाहणी दरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आराखडा समजून घेतला.
त्यांनी स्पष्ट केले की गटारीचे काम दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. पाईप लाईन टाकताना वाहतुकीला किंवा नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनीही कामाच्या तांत्रिक बाबींवर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.









