जळगाव ( प्रतिनिधी ) – आईला विजेचा धक्का लागतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्या शिवांगी काळे या चिमुकललीला आज पंतप्रधान बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.
शिवांगीने तिच्या आईचे प्राण वाचविले. ती घटना ५ जानेवारी २०२१ रोजी घडली. तिची आई बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडली बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. यातून जिल्ह्याचा लौकीक उंचावला आहे.