जळगाव शहरातील धनाजी काळे नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मावसबहिणीच्या लग्नासाठी मलकापूर येथे गेलेल्या टूरिस्ट व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्याने मुंगड यांच्या घरातून कपड्यांसह फरसाण व फळे देखील चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनिवास नारायण मुंगड (वय ३६, रा. धनाजी काळे नगर) हे शहरातील धनाजी काळे नगरात आईसह वास्तव्यास असून त्यांचा टूरिस्टसाठी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मावस बहिणीचे लग्न असल्यामुळे त्यांची आई या काही दिवसांपूर्वी लगीन घरी गेल्या होत्या. तर श्रीनिवास हे शनिवारी लग्नासाठी घराला कुलूप लावून मलकापूर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने श्रीनिवास यांच्या घराच्या कंपाऊंडमधून उडी मारून मुंगड यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले सोन्या-दागिन्यांसह रोकड घेऊन चोरटा पसार झाला.
सोमवारी सकाळी त्यांच्या वाहनावर असलेला चालक मयूर सोनार (रा. साकळी, ता. यावल) हा वाहन घेण्यासाठी मुंगड यांच्या घरी आला. यावेळी त्याला मुंगड यांच्या घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आल्याने घरात घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याने चालक सोनार याने मालकाला फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मुंगड यांनी तात्काळ जळगाव गाठले आणि त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते.