जळगाव ;- सध्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील कलावंतांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या कलावंतांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व खान्देश लोककलावंत परिषदेतर्फे धान्य स्वरुपात मदत करण्यात आली. परंतु जिल्हाभरातील गरजू कलावंतांची संख्या पाहता ही मदत अपूर्ण असून प्रशासनाकडूनही कलावंतांना मदत मिळावी अशा स्वरूपाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासह खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आवाहन केले की, जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनीही पुढे येऊन या कलावंतांना मदत करावी. याकरिता ज्यांना कोणासही मदत करावयाची असल्यास त्यांनी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे (मोबाईल क्रमांक ८८३०४९५८२२) यांना संपर्क करावा.