नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचं इच्छापत्र नसेल तर त्याच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मृत व्यक्तींच्या भावंडांआधी मुलीचा असेल मृत व्यक्तीच्या पुतण्यांना संपत्ती देण्याऐवजी प्रथम मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असतो, हिंदू उत्ताराधिकारी कायदा १९५६ लागू होण्याच्या आधी झालेल्या संपत्ती वाटपालाही हा नियम लागू होतो असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे
तामिळनाडूमधील वादाची सुनावणी करताना न्या एस. अब्दुल नजीर आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय. अर्जदार महिलेच्या वडिलांचा मृत्यू १९४९ साली झाला . या महिलेनच्या वडिलांनी स्वत:च्या कष्टाने कमावलेली आणि संपत्तीच्या वाटपानुसार मिळालेल्या संपत्तीच्या वाटपासंदर्भात कोणतेही इच्छापत्र मरणापूर्वी तयार केलेलं नव्हतं.
मद्रास उच्च न्यायालयाने निकाल देताना एकत्र कुटुंब असल्याने संपत्तीवर मरण पावलेल्या व्यक्तीच्या भावांच्या मुलांचा पहिला अधिकार असल्याचा निकाल दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करत एकुलत्या एक मुलीला वडिलांच्या संपत्तीवरील पहिला अधिकार असतो असं स्पष्ट केलंय. हा वाद न्यायालयामध्ये मृत व्यक्तीच्या मुलीचे वारसदार लढत होते.
सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकारी कायद्याअंतर्गत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर समान हक्काचा अधिकार देण्यात आल्याचं नमूद केलं. हा कायदा लागू होण्याआधी धार्मिक व्यवस्थेमध्ये सुद्धा महिलांना संपत्तीचा अधिकार होता यापूर्वीही अनेक प्रकरणामध्ये असेच निकाल देण्यात आल्याचं सांगत न्यायालयाने मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याची संपत्ती त्याच्या भावाच्या मुलांना देता येत नाही. त्या संपत्तीचा पहिला वारस मृत व्यक्तीची मुलगी असते. ही संपत्ती तिलाच देण्यात यावी. हा नियम मरण पावलेल्या व्यक्तीने स्वत: कमावलेल्या संपत्तीबरोबर वाटपानुसार मिळालेल्या संपत्तीलाही लागू होतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय.