जळगाव (प्रतिनिधी) – कायद्यानुसार शाळा, शिक्षण संस्था, सेवाभावी धर्मदाय अँक्ट अंतर्गत नोंदणी करून नफा – भाडे न कमावता ना नफा – ना तोटा तत्वावर या संस्था चालविणे अपेक्षित आहे. पण काही खाजगी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा म्हणूनच त्यांना वीज, पाणी, जागांसह सर्वच बाबतीत सवलत आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारतात व इतकी फी घेऊन देखील या शैक्षणिक संस्था विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा विचार न करता जे शिक्षक आपल्या ज्ञान दानाने या संस्थांना मोठे करून नावारूपाला आणले याच शिक्षकांना उपाशी ठेवतात. असे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी प्रविण जाधव यांनी दिले.
अतिशय तुटपुंच्या पगारावर या मंडळींकडून काम करून घेतले जात आहे. ५ ते १२ हजाराच्या आत तर काही त्याहूनही कमी पगारावर पदवी, पदवीत्तोर आंतरराष्ट्रीय भाषेत प्राविण्य असतांना ह्या शिक्षकांना ही तर वेठबिगारीच देतात गेल्या ६ महिन्यात कोरोना काळात ऑनलाईन शाळा घेणे, परीक्षा घेणे हे सुरूच आहे. सोबत शाळांनी पालकांकडून संपूर्ण फी सुद्धा वसूल केली मग शिक्षकांना अर्ध पगार का ? मुळात इतका कमी वेतन देणाऱ्या ह्या शाळांनी किमान वेतनाचा नियम पाळलाच नाही. शिक्षकांच्या जास्त वेतनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात व तुटपुंज्य रकमा हातात देतात.
खर तर जळगाव शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रत्येक हेड खालील मागील ५ वर्षांचे बॅलेंस सीट चेक करायला हवेत. ह्या संस्था नफा कमवून टोले जंग इमारती उभारत आहेत. सोबत संस्था चालकांसाठी हे मोठे हिरवेगार कुरणच आहे. आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोरडेठाक आहेत. असा विरोधाभास सुरु आहे. शहरातील किमान ५ ते १० इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर ३ ते ६ कोटींची कमाई दरवर्षी करीत आहेत संबंधित शाळा पार्किंगचे तसेच मैदानावळ खेळायचे, फिरायचे सुद्धा पैसे घेतात आणि शिक्षकांना घरभाडे एवढा पगार.
यामध्ये आपला उदरनिर्वाह कसा करायचा ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाठ नफा कमावून त्यांनी शिक्षक शिक्षकेतर यांच्या पगार किती अदाकेला याची तपासणी होणे अपेक्षित आहेत. दर वर्षी वेतन वाढ संस्थांच्या मिळकतीच्या स्लॅब वर होणे अपेक्षित आहे. शिक्षक उपाशी असतांना ज्ञानदान करतांना त्यांची मानसिकता कशी असेल याचा विचार व्हावा. पालकांना सुद्धा शाळा न जुमानता परस्पर फी वाढीचे निर्णय घेतात. निकाल दाखवण्याच्या नावाने आलेल्या पालकांच्या सह्या घेऊन पालक सभेसाठी त्या सह्यांच्या गैरवापर करतात. अधिकाऱ्यांशी त्यांचे साटे-लोटे असल्यामुळे हे सर्रास सुरु आहे.
शिक्षण मंत्री महोदय आपणांस विनंती आहे कि जळगाव शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वरील सर्व मुद्यांवर चौकशी समिती नेमावी. व शिक्षकांची होणारी उपासमार थांबवावी. अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव, संदीप घुगे, संजय वानखेडे, आनंद पाटील, विशाल पाटील, परेश श्रावगी, आर.एल.निळे, के.एस.पाटील, पी.एल.हिरे यांनी मंत्री महोदयांकडे केलेली आहे.